सध्या वातावरणातील उष्णता दिवसेंदिवस वाढत आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत असून अनेक जण शारीरिक समस्यांनी त्रस्त झाले आहेत. उकाड्यामुळे आधीच जीव बेजार झाला असतांना उन्हामुळे शरीराचीही लाहीलाही होऊ लागते. यात अनेकदा चेहरा लाल होणे किंवा चेहऱ्याची जळजळ होणे अशाही समस्या उद्भवतात. त्यामुळे या समस्येवर अनेक उपाय करुनही हा त्रास कमी होत नाही. म्हणूनच, घरच्या घरी असे काही उपाय करता येऊ शकतात ज्यामुळे हा त्रास कायमस्वरुपी दूर होईल. त्यासाठीच चेहऱ्याची जळजळ कमी करणारे फेसपॅक कोणते व ते घरी कसे तयार करायचे ते पाहुयात.
१. कोथिंबीर आणि हळद फेसपॅक –
उन्हाळ्यात चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स येण्याचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे अशा वेळी कोथिंबीर व हळद यांच्यापासून तयार केलेला फेसपॅक वापरावा. कोथिंबीर थंड आहे. तर हळद गुणकारी आहे.
कसा तयार कराल हा फेसपॅक –
दोन चमचे हळद आणि पाव वाटी कोथिंबीर एकत्र करून यांची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहर्यावर आणि गळ्याभोवती लावा आणि रात्रभर हा पॅक चेहऱ्यावरच ठेवा. सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवा. त्यामुळे त्वचा मुलायम होण्यासोबतच ब्लॅकहेड्सच्या समस्या दूर होते. आठवड्यातून एकदा तरी या फेसपॅकचा वापर करा.
कसा होतो फायदा –
या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील मोठी छिद्रे आकुंचित पावतात. कोथिंबीरमुळे चेहऱ्यावरील धूळ, मळ स्वच्छ होतो व चेहऱ्यावरील रोमछिद्रे साफ होतात. तर, हळदीमुळे त्वचेचा तेलकटपणा कमी होतो.
२.काकडी आणि साखरेचा फेसपॅक –
उन्हाळ्यात त्वचा निस्तेज होते त्यामुळे हा पॅक फायदेशीर ठरतो. या पॅकमुळे चेहऱ्यावरील चमक परत येते.
कसा तयार कराल हा फेसपॅक –
काकडी बारीक चिरून त्यात साखर मिक्स करा. त्यानंतर हे मिश्रण फ्रेजरमध्ये ठेवा. गार झाल्यावर हा लेप चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
कसा होतो फायदा –
काकडी ही दाह कमी करणारी आणि व्हिटॅमिन सी तसेच फॉलिक एसिडयुक्त आहे. त्वचा हायड्रेट करते, मुरुमांना प्रतिबंध करते, त्वचेला सूर्यापासून वाचविते. त्वचेवर चमक कायम ठेवते आणि त्वचेची आर्द्रता कायम राहते आणि त्यात ग्लायकोलिक एसिडचा समावेश असते जे सुर्याच्या हानीकारक किरणांपासून वाचविते.
३. दही आणि बेसन फेसपॅक –
उन्हाळ्यात कोरड्या त्वचेसाठी हा फेसपॅक परफेक्ट आहे. आपण हा मास्क हातांसाठी व पायांसाठीही वापरु शकतो.
कसा तयार कराल हा फेसपॅक –
दोन चमचे हरभ-रा डाळीचे पीठ( बेसन), एक चमचा दही, एक चमचा मध आणि चिमूटभर हळद एखत्र करुन त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा, हात आणि पायांवर १० मिनिटे राहू द्या. थंड पाण्याने धुण्यापूर्वी मिश्रण हळूवारपणे स्क्रब करा.
कसा होतो फायदा –
दह्यामुळे त्वचा मॉइश्चराइज होते. तर बेसनामुळे त्वचेवरील मृतपेशी काढल्या जातात.
४.दुधाचा फेसपॅक –
उन्हाळ्यामुळे खराब झालेल्या त्वचेसाठी मिल्क फेसपॅक वरदान आहेत. आपण हे फेस पॅक हात, पाय आणि मान यासाठीही वापरू शकतो.
कसा तयार कराल हा फेसपॅक –
हा फेसपॅक करण्याचे दोन मार्ग आहेत. त्यात पहिल्या पॅकसाठी ३ चमचे कच्चं दूध घेऊन त्यात २-३ लिंबाचा रस टाकावा. त्यानंतर हे मिश्रण काळवंडलेल्या त्वचेवर लावावं. तर, दुसऱ्या पॅकसाठी ३ चमचे मध आणि अर्धा वाटी दूध एकत्र करुन ते चेहरा व हाता-पायांना लावावं.
कसा होतो फायदा –
दुधामध्ये लॅक्टिक अॅसिड असते हे एक्झोलीएटर, हायड्रेटर, स्किन लाइटनर, क्लीन्सर आणि मॉइश्चरायझर म्हणून कार्य करते.
५. केळी फेसमास्क
कसा तयार कराल हा फेसपॅक –
दीड चमचा मध घेऊन त्यात एक केळं कुस्करुन घाला. त्यात दीड चमचा साय(मलई) घाला व हा पॅक २० मिनिटे चेहरा, मान, गळा यांच्यावर लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने पॅक पुसून घ्या.
कसा होतो फायदा –
हा पॅक आपली त्वचा नितळ आणि हायड्रेट करेल. केळी पॅक एक्सफोलीएटर म्हणून कार्य करते आणि त्वचेतून अतिरिक्त तेल काढून टाकते. केळी त्वचेवरील सुरकुत्या दूर ठेवण्यात देखील मदत करते.
( लेखिका डॉ. रिंकी कपूर या मुंबईतील एस्थेटिक क्लिनिक अँड फोर्टिस हॉस्पिटलमध्ये कॉस्मेटिक डमॉटोलॉजिट आणि डर्मेटो-सर्जन आहेत.)