सोरायसिस रुग्णांनी त्वचा आणि केसांची काळजी कशी घ्यावी?
सोरायसिस ही त्वचेची समस्या आहे. ऑगस्ट हा सोरायसिस जनजागृती महिना (Psoriasis Awareness Month) म्हणून मानला जातो.
सोरायसिसमध्ये रक्तामधील पांढऱ्या पेशींपैकी टी लिम्फोसाइटमध्ये काही बदल होऊन त्याचा परिणाम त्वचेच्या आतील पेशींवर होतो. यामुळे त्वचेचा एक स्तर निर्माण व्हायला नेहमीपेक्षा कमी वेळ लागतो आणि खवल्यांप्रमाणे जाड त्वचा तयार होऊन लालसर रंगाचे चट्टे त्वचेवर दिसू लागतात. तसंच या चट्ट्यांवर पांढरट पापुद्रेही येतात.
विशेषत: गुडघे, कोपर, कंबर, पाठ, डोक्यावरील त्वचा, काख, जांघा, स्तनाखालील त्वचा अशा ठिकाणी सोरायसिसचे चट्टे दिसू लागतात. त्वचेवर लालसर सूज असणारे चट्टे, चट्ट्यांभोवती खाज येणं, वेदना होणं, आग होणं, चट्ट्यांवर पांढरट रंगाचे पापुद्रे येणं, खाजवल्यास पापुद्रे निघणं, सांध्यांमधील वेदना, सूज ही सोरायसिसची लक्षणं आहेत.
आनुवंशिक, घर्षण, कुठल्याही प्रकारची इजा, घशाचा जंतुसंसर्ग, धूम्रपान, मद्यपान, इतर आजारांवरील औषधांचा परिणाम सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक ताणदेखील सोरायसिससाठी कारणीभूत ठरतं.
सोरायसिस असल्यास त्वचा आणि केसांच्या स्वच्छतेकरिता सौम्य अशा उत्पादनांचा वापर करा. दिवसातून एकदाच अंघोळ करा. त्याकरिता सौम्य साबणाचा वापर करा.
त्वचा कोरडी पडणार नाही याची काळजी घ्या. त्वचेला नियमित मॉईश्चराईज करा. जेव्हा त्वचेमध्ये कोरडेपणा जाणवेल त्यावेळी त्याचा त्वरीत वापर करणं फायदेशीर ठरेल. नारळाच्या तेलामध्ये कोरफडीचा गर मिसळून घरच्या घरी मॉईश्चरायझर बनवू शकता. मध आणि हळद या दोन्ही गोष्टींचा वापर त्वचेवर करू शकता. झोपताना त्वचेवर पेट्रोलिअम जेल तसंच ऑलिव्ह ऑईलचा वापर करू शकता.
त्वचेला हानी पोहोचणार नाही तसंच जखम होणार नाही याची पुरेपुर काळजी घ्या. सतत खाजवणं टाळा. त्वचारोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने मलम तसंच औषधांचा वापर करा.
सोरायसिसमध्ये हाताची आणि पायांची नखंही खराब होऊ शकतात, त्यामुळे नखं स्वच्छ ठेवा.
तीव्र सूर्यप्रकाश, सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचा आणि केसांचं संरक्षण करा.
केस विंचरताना ते ताणू नका. केसांसाठी इलेक्ट्रॉनिक मशीनचा वापर जास्त करू नका.
हेअर कलर करण्यापूर्वी दोन दिवस आणि नंतरचे दोन दिवस शाम्पूचा वापर करू नका. हेअर स्टाईल करताना उत्पादनांचा वापर काळजीपूर्वक करा.
संतुलित आहार आणि व्यायामाला प्राधान्य द्या. औषधं, नॅरो बॅण्ड यूव्हीबी किरणोपचार, सिमर लेजर यामुळे बऱ्याच प्रमाणात सोरासिसला नियंत्रणात ठेवता येतं, असं द एस्थेटिक क्लिनिक्सच्या सल्लागार डर्मेटोलॉजिस्ट डॉ. रिंकी कपूर यांनी सांगितलं.
Article Source – https://lokmat.news18.com/photogallery/photo-gallery/psoriasisi-awareness-month-how-to-take-care-skin-and-hair-mhpl-472155.html
https://www.esakal.com/mumbai/august-celebrated-globally-psoriasis-awareness-month-333702?amp
https://www.loksatta.com/lifestyle-news/psoriasis-hair-diseases-ssj-93-2247493/