पावसाळ्यात जपा पायांचं सौंदर्य; घ्या ‘ही’ काळजी
पावसाळ्यात होणाऱ्या पायांच्या समस्यांना ठेवा दूर
डॉ. रिंकी कपूर
अनेकांच्या आवडता ऋतू म्हणजे पावसाळा. त्यामुळे अनेक जण पावसाळ्यात ट्रेकिंगला जाणं, पावसात भिजणं हे सारं काही करणं पसंत करतात.परंतु,काही वेळा सतत पावसात भिजल्यामुळे किंवा हात-पाय ओले राहिल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. पावसाळ्यातील दमट वातावरण, बदलेले हवामान तसेच ओलाव्यामुळे पायाचे विकार जडतात. दुर्गंधीयुक्त तळवे, नखांभोवती साचलेली घाण, ओलाव्याने पायांच्या खाचांमध्ये होणारे बुरशीजन्य संसर्ग या सा-याकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे या दिवसांमध्ये पायाची किंवा हातांची कळजी कशी घ्यावी याच्या काही टीप्स पुढीलप्रमाणे.
१. आपले पाय नेहमी कोरडे ठेवा.
२. पावसात भिजून आल्यानंतर पाय स्वच्छ धुवून कोरडे करा. तसंच पायांच्या बेचक्यांमध्ये जमा झालेला चिखल स्वच्छ करा.
३. अनवाणी पायाने चालू नका.
४.थंड जमिनीवर अथवा पावसाळ्यातील ओल्या गवतावर अनवाणी पायांनी फिरणे टाळावे. यामुळे पायांना जंतूसंसर्ग आणि बुरशीजन्य संसर्गाची लागण होण्याची दाट शक्यता असते.
५. आपले पाय खूप वेळ पावसाच्या पाण्यात राहिल्यास कोमट पाण्यात थोडेसे मीठ घाला आणि त्यात १० मिनीटे पाय बुडवून ठेवा.
६. पायांकरिता एन्टीफंगल पावडरचा वापर करा. पायात मोजे घालण्यापूर्वी पाय स्वच्छ कोरडे करून घ्या.
७. पायांकरिता चांगल्या क्रिमची निवड करून दररोज मॉईश्चराईज करा.
८. पायाची नखं वेळोवेळी कापावीत. वाढलेल्या नखांमध्ये घाण जाऊन संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे पायाची नखं जास्त न वाढविता ते वेळीच कापणे गरजेचे आहे.
९.चांगल्या प्रतीच्या पादत्राणांची निवड करावी. पादत्राणे नेहमी कोरडी ठेवावीत. सर्वच बाजूने बंद असणा-या पादत्राणांची निवड करू नका.
१०. पावसाळ्यात गमबुट वापरणे उत्तम ठरेल. त्यामुळे साचलेल्या घाण पाण्यापासून पायांचे संरक्षण करता येईल.
११. पायाला एखादी जखम झाली असल्यात तिची नीट काळजी घ्या. घाण पाणी, माती या जखमेमध्ये शिरणार नाही याकडे लक्ष घ्या.
Article Source – https://www.loksatta.com/lifestyle-news/lifestyle-health-foot-precaution-tips-ssj-93-2226513/