माणसाचे पाय म्हणजे अभियांत्रिकी आणि कलेचा उत्कृष्ट नमुना असल्याचे एका प्रसिद्ध कलाकाराने म्हटलंय. आपले हात-पाय कधीही काम करणे थांबवत नाहीत. पावसाळ्यात पायांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. पावसाळ्यातील दमट वातावरण, बदलेले हवामान तसेच ओलाव्यामुळे पायाचे विकार जडतात. दुर्गंधीयुक्त तळवे, नखांभोवती साचलेली घाण, ओलाव्याने पायांमधील खाचांमध्ये होणारे बुरशीजन्य संसर्ग या सा-यांना वेळी आळा घालणे गरजेचे आहे. याकरिता खालील काही टिप्स वापरुन तुम्ही पावसाळ्यातील पायांच्या समस्यांना नक्कीच दूर ठेवू शकता असे द एस्थेटिक क्लिनिक्स’च्या सल्लागार डरमॅटोलॉजिस्ट डॉ. रिंकी कपूर यांनी म्हटलंय.
अशी घ्या काळजी
रस्त्यावर साचलेल्या अस्वच्छ पाण्याच्या डबक्यात उड्या मारू नका. या पाण्यात असंख्य विषाणु असतात जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही मात्र त्यामुळे पायाला बुरशी संसर्ग होऊ शकतो.
आपले पाय नेहमी कोरडे ठेवा. पावसाळ्यात बाहेरून आल्यानंतर पाय स्वच्छ पाण्याने धुवून ते कोरडे करणे अधिक गरजेचे आहे. पाय सतत ओले राहिल्याने पायाच्या बेचक्यांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता असते.
अनवाणी पायाने चालू नका. थंड जमीनीवर अथवा पावसाळ्यातील ओल्या गवतावर अनवाणी पायांनी फिरणे टाळावे. यामुळे पायांना जंतूसंसर्ग आणि बुरशीजन्य संसर्गाची लागण होण्याची दाट शक्यता असते.
आपले पाय खुप वेळ पावसाच्या पाण्यात राहिल्यास कोमट पाण्यात थोडेसे जंतुनाशक द्रव्य घाला आणि त्यात आपले पाय बुडवून ठेवा. साधारण 10 मिनिटे या पाण्यात आपले पाय बुडवून ठेवा आणि त्यानंतर पाय धुवुन ते कोरडे करून घ्या.
पायांकरिता एन्टीफंगल पावडरचा वापर करा. पायात मोजे घालण्यापुर्वी पाय स्वच्छ कोरडे करून घ्या.
पायांकरिता चांगल्या क्रिमची निवड करून दररोज मॉईश्चराईज करा. सकाळी अंघोळीनंतर व रात्री झोपण्यापुर्वी या क्रिम्सचा वापर करावा. त्यामुळे एलर्जीपासून दूर राहणे शक्य होईल तसेच पायांचे सौंदर्य टिकविता येईल.
पायाची नखं वेळोवेळी कापावीत. वाढलेल्या नखांमध्ये घाण जाऊन संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे पायाची नखं जास्त न वाढविता ते वेळीच कापणे गरजेचे आहे.
चांगल्या प्रतीच्या पादत्राणांची निवड करावी. पादत्राणे नेहमी कोरडी ठेवावीत. सर्वच बाजूनी बंद असणा-या पादत्राणांची निवड करू नका. पावसाळ्यात गमबुट वापरणे उत्तम ठरेल. त्यामुळे साचलेल्या घाण पाण्यापासून पायांचे संरक्षण करता येईल.
पायाला एखादी जखम झाली असल्यात ती झाकून ठेवा. घाण पाणी, माती या जखमेमध्ये शिरणार नाही याची पुरेपुर काळजी घ्या.
Article Source – https://zeenews.india.com/marathi/health/an-easy-way-to-take-care-of-your-feet-in-the-rain/528161