होळीच्या रंगांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी खास टिप्स
होळीचा सण म्हणजे रंगाची उधळण. याकरिता वापरल्या जाणार्या रंगांमध्ये असणारे रासायनिक पदार्थ त्यामुळे त्वचेवर होणारे गंभीर परिणाम टाळायचे असल्यास प्रत्येकाने आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. केमिकलयुक्त रंगांमुळे त्वचेच्या विविध समस्या उद्भवू शकतात जसे की त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर डाग पडणे,लालसरपणा आदीचा सामना करावा लागू शकतो. याचा अर्थ असा नाही की आपण रंगांनी खेळू शकत नाही आणि या उत्सवाचा आनंद घेऊ शकत नाही. तर त्वचेचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी आपल्याला होळी खेळण्यापुर्वी आणि खेळल्यानंतर विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. होळीसाठी त्वचेची काळजी घेणे खरोखरच सोपे आहे त्यासाठी आपण काय करू शकता याविषयी द एस्थेटिक क्लिनिकचे सल्लागार त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. रिंकी कपूर यांनी अधिक माहिती दिली आहे.
होळी खेळण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी
- केसांना चांगले तेल लावा. होळी खेळण्यापूर्वी नारळाच्या तेलाचे काही थेंब कोरफडीच्या गरामध्ये मिसळा हे मिश्रण आपले केस तसेच टाळूवर घाला.
- चांगल्या प्रतीचे मॉइश्चरायझर किंवा तेल वापरा. आपण आपल्या चेह-यासाठी नारळाचे तेल किंवा एरंडेल तेल देखील वापरू शकता. याची खात्री करुन घ्या की तुम्ही सर्व उघडलेली त्वचा विशेषत: कानाच्या मागील भागावर कव्हर केली आहे.
- जेल बेस सनस्क्रीन वापरा आणि बाहेर पडण्यापूर्वी 15 मिनिटे सनस्क्रीन लावा.
- होळीचा रंग त्वचेच्या थेट संपर्कात येण्यापासून टाळण्यासाठी ओठांवर, नखांवर आणि डोळ्याभोवती व्हॅसलीन पेट्रोलियम जेलीचा एक थर लावा.
- डोळ्याचे रक्षण करण्यासाठी तसेच सूर्यप्रकाशापासून बचाव करणयासाठी चष्म्याचा वापर करा.
- त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित कालांतराने रस आणि पाणी प्या.
- केस लांब असतील तर ते वर बांधा अथवा स्कार्फने झाकून ठेवा.
होळी खेळल्यानंतर काय काळजी घ्याल?
- त्वचेरील रंग काढण्याच्या प्रयत्नामध्ये त्वचा घासली जाणार नाही याची काळजी घ्या.
- त्वचा आणि केसांवरील रंग सौम्य क्लीन्झरचा वापर करा.
- शैम्पू किंवा साबण वापरण्यापूर्वी टाळू आणि त्वचेवरील संपूर्ण रंग धुवून घ्या.
- आंघोळ केल्यावर चेह-यावर मॉइश्चरायझर आणि सीरम लावा.
- केस पूर्णतः कोरडे करा.
- होळी उत्सवानंतर किमान आठवडाभर स्पा, सौना किंवा त्वचेच्या उपचाराकरिता जाण्याचे टाळा
होळीनंतर रंगांच्या परिणामापासून मुक्त होण्यासाठी चांगल्या दर्जाचे तसेच घरच्या घरी तयार केलेले फेस पॅक वापरा:
बदाम आणि मध यांचा फेसपॅक : मध आणि सोबत काही भिजवलेले बदाम, लिंबाचा रस आणि २ चमचे दूध घाला. ही पेस्ट आपल्या त्वचेवर लावा आणि ते कोरडे होऊ द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. हे पॅक त्वचेला हायड्रेटेड ठेवते आणि सुरकुत्या येण्यास प्रतिबंध करते. .
बेसन आणि दही : थोडा बेसन, दही २ थेंब गुलाबाच्या पाण्यासोबत चिमूटभर हळद घाला. हे मिश्रण त्वचेवर लावा आणि २० मिनीटानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. हे पॅक त्वचेला कोरडे होण्यापासून प्रतिबंधित करते.
मसूर डाळ आणि संत्र्याची साल: एक चमचा मसूर डाळ, एक चमचा वाळलेल्या संत्राची साल, एक चमचा गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर आणि २ थेंब लिंबाचा रस मिसळा. हा पॅक चेहरा आणि मानेवर लावा. हा पॅक सुकल्यावर हाताला थोडेसे पाणी लावा आणि फेस पॅक हलक्या हाताने काढून टाका. हे पॅक त्वचेचे नुकसान होण्यापासून वाचवेल तसेच त्वचेवरील मृत पेशींचा थर काढून टाकेल आणि त्वचा गुळगुळीत होण्यास मदत करेल.
लिंबू आणि कोरफड: लिंबाच्या रसाच्या कोरफडचा गर एकत्र करून हे मिश्रण कापसाच्या सहाय्याने आपल्या चेह-यावर लावावे. हा पॅक टॅन काढून टाकण्यास मदत करेल, चेह-यावरील डागांवर प्रभावी ठरेल.